नाशिक लाईव्ह न्यूज । आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील जव्हार एकात्मिक येथील आदिवासी विकास प्रकल्पाच्या संचालक व सहायक जिल्हाधिकारी करिष्मा नायर यांची महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नायर यांच्या बदलीची ऑर्डर मनपा प्रशासनाला मंगळवारी (दि. १८) सायंकाळी प्राप्त झाली. यामुळे आता महापालिकेला तिसरे अतिरिक्त आयुक्त मिळणार आहे.
महापालिकेत सध्या दोन अतिरिक्त आयुक्त कार्यरत आहे. त्यात प्रदीप चौधरी (शहर) व स्मिता झगडे (सेवा) यांचा समावेश आहे. आता शासनाने तिसरे आयुक्त म्हणून करिष्मा नायर यांची नियुक्ती केली. वास्तविक एका अतिरिक्त आयुक्तांची बदली झाल्यानंतर त्या जागेवर अन्य अतिरिक्त आयुक्तांची नियुक्ती करणे अपेक्षित असताना नायर या तिसऱ्या आयुक्त म्हणून रुजू होणार आहेत. यापूर्वी शासनाने कार्यकारी अभियंता पदी महुआ बॅनर्जी यांची नियुक्ती केली. त्यानंतर सिंहस्थासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची घोषणा केली. त्यामुळे स्थानिक विरुद्ध परसेवेतील अधिकारी, असा वाद निर्माण झाला आहे. त्यात आता पुन्हा तिसरे आयुक्त नियुक्त करण्यात आल्याने वादात भर पडली आहे.
प्रदीप चौधरी गेल्या दोन वर्षापासून अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत आहे. त्यांची मुदत संपुष्टात आली, परंतु शासनाने चौधरी यांची बदली केली नाही. दुसरीकडे स्मिता झगडे यांना एकच वर्ष पूर्ण झाले आहे. त्या नगरविकास विभागाच्या आहेत. त्या मॅटमध्येही जाऊ शकतात. प्राधिकरणासाठी अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा भाग म्हणून कुंभमेळ्याचा कार्यभार त्यांच्याकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.