नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिक महापालिका क्षेत्रामध्ये पशुसंवर्धन विभागाचा परवाना न घेताच शहरातील सुमारे ६०० विक्रेत्यांकडे मांस विक्री सुरू असल्यामुळे आता अन्न व औषध प्रशासनामार्फत कारवाईसाठी हालचाली सुरू झाले आहे. त्यासाठी महापालिका अन्न व औषध प्रशासन विभागाकडे प्रस्ताव पाठवणार आहे.
शहरामध्ये उघड्यावर मांस विक्री करण्यासाठी पूर्णपणे बंदी आहे. महापालिकेने मांस विक्रीसाठी तयार केलेल्या उपविधीनुसार बंदिस्त जागेमध्ये मांस विक्री करणे अपेक्षित आहे. तसेच अन्य नियमांचे काटेकोरपणे पालनदेखील करावे लागते. पशुसंवर्धन विभागाकडे असलेल्या नोंदीनुसार साडेनऊशेपेक्षा अधिक मांस व मासळी विक्रीची दुकाने आहेत. त्यापैकी मनपाच्या पशुसंवर्धन विभागाकडे २५० विक्रेत्यांनी रितसर परवाना घेतला असून, सुमारे सहाशेहून अधिक मांस विक्रीचा व्यवसाय करणारे अनधिकृत आहेत.
अनेकदा तर दंडही भरला जात नाही. अशा वेळी कारवाईचे अधिकार नसल्याने मनपा पथकांना माघारी फिरावे लागते. त्यामुळेच आता मनपाच्या पशुसंवर्धन विभागाने राज्य शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाला पत्र पाठवून संबंधित अनधिकृत मांस व मासळी विक्रेत्यांची यादी सादर करून कारवाईसाठी साकडे घातले जाणार असल्याचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांनी सांगितले.
दुकाने सीलचा प्रस्ताव
मांस विक्रीचा परवाना न घेणाऱ्या दुकानदारांवर आता सील करणे किंवा गुन्हा दाखल करण्याचे अधिकार एफडीएकडे असल्याने तसा कारवाईसाठी प्रस्ताव पाठवला आहे. – डॉ. प्रमोद सोनवणे, पशुसंवर्धन अधिकारी, मनपा