नाशिक लाईव्ह न्यूज । २९ जानेवारी २०२५ । नाशिक शहर (Nashik City) वासियांकरीत पाणीपुरवठ्याबाबत एक महत्वाची बातमी आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी सर्व जलशुद्धीकरण बंद राहणार असल्याने संपूर्ण शहराचा (दि. १ फेब्रुवारी) शनिवारी दिवसभराचा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. रविवारी (दि. २) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्यानं याची नागरीकांनी नोंद घ्यावी असे आवाहन मनपाच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.
नेमकं कारण काय?
मनपाच्या गंगापुर धरण पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील १३२ के.व्ही. सातपूर व महिंद्रा या दोन फिडरवरून ३३ के. व्ही. एच.टी. वीजपुरवठा घेण्यात आलेला आहे. सदर पंपिंगद्वारे मनपाचे बाराबंगला, शिवाजीनगर, पंचवटी, निलगिरीबाग, गांधीनगर व नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्र यांना रॉवॉटरचा पुरवठा करण्यात येतो. तसेच मुकणे रॉ-वॉटर पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील रेमण्ड सबस्टेशन गोंदे येथून एक्सप्रेस फिडरवरून जॅकवेलसाठी ३३ के.व्ही. वीजपुरवठा कार्यान्वित आहे.
गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथे नवीन बीपीटीचे काम सुरू असून सदर कामात अडचणीचे ठरणाऱ्या ३३ केव्ही ओव्हर हेड एच.टी. लाइनची महावितरण कंपनीच्या उपस्थितीत शिफ्टिंग करणे व त्याअनुषंगाने सबस्टेशन, पंप हाऊसमधील विद्युतविषयक कामे व इतर संबंधित कामे केली जाणार आहेत. तसेच मुकणे धरण पंपिंग स्टेशन येथील सबस्टेशन, पंप हाऊसमधील विद्युतविषयक कामे व इतर संबंधित कामे, विविध जलशुद्धीकरण केंद्र येथील सबस्टेशनमधील कामे व स्मार्ट सिटीअंतर्गत शटडाऊन अंतर्गत फ्लो मीटर बसविणे व विविध कामे इ. मनपातर्फे नियोजित आहेत.
त्यामुळे गंगापूर धरण व मुकणे धरण येथून सदर कालावधीत पंपिंग करता येणार नाही. नागरिकांनी नोंद घेऊन मनपास सहकार्य करण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.