नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सिटी लिंक बस खड्ड्यात आदळल्यानं एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे. संतोष माळी असं मयत व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
सिटी बसमधून संतोष माळी आणि त्यांच्या पत्नी प्रवास करत होते. बस रस्त्यावरून जात असताना रस्त्याच्या मधोमध एक खड्डा आला होता. खड्ड्यात बस जोरात आदळल्यानं प्रवासी सीटच्या पाठीमागील भागावर संतोष माळी हे जोरात उडून पोटावर पडले.
पोटाला जोरात मार बसल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतोष माळी यांच्या पत्नी माया माळी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रार दाखल केल्यानंतर नाशिकरोड पोलिसांनी अधिक तपास केला. त्यानंतर नाशिक रोड पोलिसांनी सिटी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर खड्ड्यांमुळे आणखी किती निष्पाप जीवांचे प्राण जाणार? किती प्रवाशांना दुखापत सहन करावं लागणार? असा संतप्त सवाल नागरीकांकडून विचारण्यात येत आहे.