नाशिक लाईव्ह न्यूज । ३० जून २०२५ । एकीकडे नाशिकमध्ये अपघाताच्या घटना काही केल्या कमी होत नसून अशातच नाशिकमधील चांदोरी येथे हिट अँड रनची घटना घडली आहे. भरधाव डंपरने सायकलवरून शाळेत जाणाऱ्या १२ वर्षीय विद्यार्थिनीला चिरडले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. सिद्धी मंगेश लुंगसे असं मयत विद्यार्थिनीचे नाव असून या अपघातानंतर चांदोरी गावातील नागरिकांनी रास्ता रोको केला.
नाशिक-संभाजीनगर महामार्गावरील नागपूर फाटा परिसरात सोमवारी (ता. ३० जून) सकाळी ही संतापजनक घटना घडली. सिद्धी ही चांदोरीतील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सातवी इयत्तेत शिकत होती. ती सकाळी सायकलवरून शाळेत जाण्यासाठी निघाली. मात्र रस्त्यात एका भरधाव डंपरनं सिद्धीला चिरडले यात तिचा जागीच मृत्यू झाला.या घटनेनं संपूर्ण चांदोरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघातानंतर डंपरने समोरून येणाऱ्या दुचाकीलाही धडक दिली. यात दुचाकीवरील पती-पत्नीला गंभीर दुखापत झालीय. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डंपरचा वेग प्रचंड होता, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको
ही घटना घडताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी चांदोरी-निफाड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. डंपर चालकावर तत्काळ कठोर कारवाई करा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली. या आंदोलनामुळे महामार्गावर दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काही काळासाठी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस पोहोचले. त्यांनी संतप्त जमावाची समजूत काढली. आंदोलकांना शांत केले.