नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिकच्या (Nashik) इगतपुरी तालुक्यात (Igatpuri) शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. खासगी शाळेत शिकणाऱ्या १३ वर्षीय विद्यार्थिनीवर शाळेच्याच मुख्याध्यापकाने आपल्या सहकारी शिक्षकाच्या मदतीने अत्याचार केल्याची घृणास्पद घटना घडली.
या घटनेमुळे तालुक्यात संतापाची लाट पसरली असून, शाळेत ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन करतानाच घटनेच्या निषेधार्थ गावात कडकडीत बंद पाळला. दरम्यान, पोलिसांनी मुख्याध्यापकासह एका शिक्षकास अटक करीत त्यांच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दोघांना बडतर्फ करण्याचे आदेश दिल्यानंतर संस्थेने दोघांना निलंबित केले आहे.
मुख्याध्यापक तुकाराम साबळे याने या विद्यार्थिनीस ‘मी सांगेल तेव्हा माझ्या घरी ये,’ असे सांगितले. त्यानंतर दुपारी शाळेतीलच शिक्षक गोरखनाथ जोशी (४३) याने तिला साबळेच्या घरी पाठवले.