नाशिक लाईव्ह न्यूज । राज्याच्या अर्थसंकल्पात नाशिक-त्र्यंबक रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि सहापदरीकरण यासाठी ३५० कोटी तर नाशिक-दिंडोरी-वणी रस्त्यासाठी १०० कोटींचा निधी आरक्षित करण्यात आला आहे. सिंहस्थासाठी नाशिकच्या सभोवताली ९१ किलोमीटरचा रिंगरोड साकारण्यात येणार असून, अर्थसंकल्पात नाशिक-त्र्यंबक रस्त्याच्या निधीसह इतर रस्त्यांच्या विकासकामांसाठी २२७० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या सर्व कामांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लवकरच सुरुवात होणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी दिली.
सिंहस्थ तयारीसाठी दर मंगळवारी (दि. ११) जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात सिंहस्थाशी संबंधित कामांचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतखोली बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर आयुक्त गेडाम यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
गेडाम म्हणाले की, नाशिकमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता, वाहनांसाठी रस्ते सुस्थितीत असणे गरजेचे आहे. ज्या रस्त्यांच्या कामांसाठी दोन वर्षे लागणार आहेत, अशा रस्त्यांची कामे येत्या काही दिवसांत सुरू करण्यात येतील. याशिवाय गोदाघाटावरील घाटांच्या निर्मिती, नाशिकमधील आणि नाशिककडे येणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती, डागडुजी आदी कामांना सुरुवात होईल. ही सर्व कामे करताना नाशिक शहर आणि ग्रामीण पोलिस दलाचा ट्रॅफिक प्लॅन लक्षात घेणे आवश्यक आहे.
या मार्गांचा होणार विकास
नाशिक-दिंडोरी रस्त्यावरील उनंदा नदीवरील पूल : 15 कोटी
दुगाव ते जऊळके त्र्यंबकसाठी : 215 कोटी
जानोरी-ओझर 50 कोटी, भरवीर टाकेद, बैज यासाठी : 119 कोटी
चिंचोली-वडगाव पिंगळा-विंचूर दळवी-पांढुर्ली रस्ता : 207 कोटी
वाडीवर्हे, दहेगाव, जातेगाव, तळेगाव, महिरावणी, दुडगाव, गणेशगाव रस्ता : 200 कोटी
दुगाव-ढकांबे-जऊळके रस्ता : 163 कोटी, शिर्डी-राहता बाह्यवळण रस्ता : 165 कोटी
त्र्यंबकेश्वर-तुपादेवी-तळवाडे-उमराळे-दिंडोरी-पालखेड जोपुळ-पिंपळगाव : 215 कोटी
दुगाव, जुने घागुर, ढकांबे, आंबे दिंडोरी, जऊळके रस्ता : 163 कोटी
पेठ, तोरंगण, हरसूल, वाघेरा, अंबोली, पहिने, घोटी रस्ता : 205 काटी
जानोरी-ओझर आंतरराष्ट्रीय विमानतळ : 50 कोटी
आडगाव, गिरणारे, वाघेरा, हरसूल, ओझरखेड रस्ता : 157 कोटी
त्र्यंबक,देवगाव, खोडाळा रस्ता : 47 कोटी
इतर कामांसाठी 17 कोटी