नाशिक लाईव्ह न्यूज । फेब्रुवारी (February) महिना अद्याप संपला नाहीय. परंतु आतापासूनच उन्हाचा चटका वाढला आहे. नाशिकचा तापमानाचा (Nashik Tapman) पारा ३५ अंशावर गेला आहे. वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईचे सावट दिसून येते. परंतु गेल्यावर्षी पावसाळ्यात वरुणराजाने कृपादृष्टी ठेवल्याने नाशिककरांची तहान भागविणार्या गोदावरी नदीवरील (Godavari River) गंगापूर धरणात (Gangapur Dam) यंदा गतवर्षीपेक्षा 15 टक्के पाणीसाठा जादा आहे. सद्यस्थितीत गंगापूर धरणात 78.76 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
गंगापूर धरण समुहातील गोदावरी नदीवरील गंगापूर धरण सर्वात मोठे असून, काश्यपी, गौतमी गोदावरी हे मध्यम स्वरुपाचे तर आळंदी नदीवरील मध्यम स्वरुपाचे आळंदी अशी एकूण 4 धरणे आहेत. या चारही धरणांची एकूण 10166 दलघफु पाणीसाठा साठविण्याची क्षमता आहे. गेल्यावर्षी गंगापूर धरण समुहात एकूण 6861 दलघफु अर्थात 67.49 पाणीसाठा शिल्लक होता.
यंदा हाच पाणीसाठा 7209 दलघफू अर्थात 70.91 टक्के शिल्लक आहे. पालखेड धरणसमुहात केवळ 11 टक्के पाणीसाठा शिल्लक असून, गिरणा खोरे धरण समुहात 67.69 टक्के साठा शिल्लक आहे. फेब्रुवारीच्या मध्यावर गंगापूर धरणात 78 टक्के पाणीसाठा शिल्लक असला तरी पुढील चार महिने उन्हाळ्याचा तडाखा नाशिककरांना सहन करावा लागणार असल्याने पाणीसाठा जपून वापरणे आवश्यक आहे.
गेल्यावर्षी 201 विहीरींचे अधिग्रहण
गेल्यावर्षी जिल्ह्यातील 348 गावे आणि 872 वाड्या अशा एकूण 1 हजार 220 गाव-वाड्यांना 370 टँकरच्या 814 फेर्यांद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. टँकर भरण्यासाठी तब्बल 201 विहीरींचे अधिग्रहण करण्यात आले होते. यंदा मात्र अशी परिस्थिती नसल्याने गाव, वाडी वस्त्यांना पाणी पुरण्याची शक्यता आहे.